Friday, November 1, 2013

भूक.....

भूक.....

वय वर्षे ७...फार तर ८...तिचं कोवळेपण तिच्या त्या तसल्या ओंगळवाण्या अवतारात सुद्धा ठळकपणे जाणवत होतं. नाशिक चि थंडी अंगात हुडहुडी भारत होती...पण फक्त माझ्याच....सुमारे १२०० रुपयांचं सो कॉल्ड ब्रांडेड जाकेट घालून घराबाहेर उन पाळ्याखात बसलो होतो....आणि तेवढ्यात वयाशी बंड करून खडबडीत झालेला एक आवाज कानांवर पडला. पूर्ण अंग झाकण्याचा अतोनात प्रयत्न करूनही तोकड्या पडणाऱ्या कपड्यांमधलं ते कोवळ पोर....पायांत चपलांसारखंच काहीतरी....एका हातात घट्ट धरलेली  एक प्लास्टिकची पिशवी जी अर्ध्याच्या थोडीफार वर भरली असेल....कोणती संपत्ती इतकी जपून ठेवली होती कोण जाणे. आणि दुसऱ्या हातात एक छोटा कडी असलेला स्टील चा डबा.....चेहऱ्यावर न जाणो कितीक दिवसांची भूक दाटून आलेली....परिस्थितीच्या वादळांनी शरीर ओसाड झालेलं असलं, तरी डोळ्यातलं कारुण्य अजूनही कायम होतं....प्रत्येक घरात अतोनात आशेनं डोकावणारी तिची नजर काळीज पिळवटून टाकणारी होती....समोरच्या घरासमोर येताच तीन कंठरवाने आवाज दिला....ओ ताई, द्या भाकरी-भाजी.....घरातून एक वृद्ध स्त्री बाहेर आली. रोजच्याच सारावाप्रमाणे त्या स्त्रीच्या हातात दोन भांडी आणि चेहऱ्यावर एक विचित्र भाव...एका हातात फेकण्यासाठीचं उष्टं पाणी आणि दुसऱ्या हातात दारातल्या चिमुकलीचा खाऊ ! तिच्या नातीला जितक्या प्रेमानं भरवत असेल तितक्याच निर्भावतेनं, किंबहुना तिरस्कारानं तीन हातातली भाजीची ताटली हिच्यापुढ धरली...कधीची, ते तिलाच ठाऊक....पण याचा विचार हिनं केलाच नाही मुळी. हिनंही तितक्याच  नेहमीच्या सवयीप्रमाणे ताटलीतल्या भाजीतला पातळ भाग स्टील च्या डब्यात नितरून घेतला आणि उरलेला सुका भाग पिशवीतल्या अनेक छोट्या पिशव्यांपैकी एकीत उपडा केला.....न राहवून मी डोळे मिटतच होतो कि माझ्या कानांवर पुन्हा तीच हाक ऐकू आली....अधिक जवळून....अधिक आर्तपणे...आणि अधिक भेदत जाणारी....ओ दादा...द्या भाकरी-भाजी.....