Wednesday, December 11, 2013

विनय आपटे...

विनय आपटेंशी पहिली आणि दुर्दैवाने शेवटची भेट...

विनय आपटे....नुसतं नाव उच्चारलं तरी त्याखाली दबल्यासारखं व्हायला होतं... त्यांचा करारी आणि भारदस्त आवाज कानांवर पडतो...त्यांच्या अभिनय आणि संवादफेकीची ती अजब पण थेट जाऊन भिडणारी शैली सर्रकन समोर उभी रहाते...आणि तो माणूस तर सो़डा पण त्या नावापुढेच आपण किती खुजे आहोत याचा साक्षात्कार होतो...विशेष म्हणजे जितक्या वेळा हे नाव येतं, तितक्या वेळा हि जाणीव होते. अर्थात, त्यांचं कर्तृत्व हे इतरांना खुजं वाटावं म्हणून नव्हतं. पण त्यांच्या आवाजाचा भारदस्तपणा त्यांच्या नावात आपोआपच उतरला आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा भार मराठी चित्रपट जगतावरून कधीच हलका होऊ शकणार नाही.

खरंतर इतर लाखो प्रेक्षकांप्रमाणेच मीही विनयजींच्या अभिनयाचा मोठा चाहता. अभिनय क्षेत्रातले जे काही मोजके कलाकार मला मनापासून आवडतात, त्यातले विनयजी एक. अभिनयात त्यांची ती धारदार नजर पाहून मनात जाणते अजाणतेपणी धस्स व्हायचं आणि वाटायचं, प्रत्यक्षातही हा माणूस असाच असेल का? त्याची प्रचीती लवकरच आली...अगदी शब्दश: अनपेक्षितपणे.

काही महिन्यांपूर्वी मुंबईत एका मित्राला भेटण्यासाठी त्याच्या स्टुडिओत गेलो होतो. सोफ्यावर बसून त्याच्याशी गप्पा सुरूच होत्या की बाजूच्या सोफ्यावर कोणीतरी येऊन बसल्याचं जाणवलं. पण ते कोण आहे हे न पहाताच मी मित्राशी गप्पा सुरू ठेवल्या..म्हटलं असेल कुणीतरी त्यांच्यापैकीच एक...थोड्या वेळाने सहजच बोलता बोलता माझी नजर तिकडे गेली आणि काही क्शण माझा माझ्यावरच विश्वास बसला नाही...खरंतर कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटिला याचि देही याची डोळा पाहण्याची ही माझी पहिलीच वेळ होती...पण ती व्यक्ती प्रत्यक्ष विनयजी असतील आणि ते इतक्या बेमालूमपणे बाजूला येऊन बसावेत की त्यांच्यापैकीच एक वाटावेत याचा मला मोठा धक्का बसला...पुढे जे काही मित्राशी बोललो त्यात अजिबात लक्ष लागेना...थोड्या वेळाने त्यानेच माझी विनयजींशी ओळख घालून दिली...खरंतर ते वयाने माझ्यापेक्षा साधारण दुप्पट आणि कर्तृत्वाने म्हणाल तर मी त्यांच्या कुठेच नाही...पण असं असूनही ज्या प्रसन्नपणे त्यांनी हसून माझं अभिवादन केलं, ते पाहून आश्चर्य आणि आदर या दोनही भावनांनी गर्दी केली...पहिल्यच शब्दांत त्यांनी माझी अशी विचारपूस केली की जणू काही माझी त्यांच्याशी फार जुनी ओळख होती...मी दिल्लीत असतो हे समजल्यावर दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका गोळीबाराबद्दल त्यांनी मला विचारलं...प्राथमिक गप्पा झाल्यानंतर त्यांनी तिथेच एकाकडे वर्तमानपत्राची मागणी केली...आणि थोडा चाळून झाल्यानंतर थेट त्यातलं कोडं सोडवायला सुरूवात केली. मला म्हणाले, कोडी सोडवणं फार उत्तम. यानं स्मरणशक्ती उत्तम रहाते. आता आपलंही वय होत आलंय, त्यामुळे स्मरणशक्तीसाठी दवाखाना मागे लागण्यापेक्षा हा पर्याय उत्तम आणि पुन्हा एकदा ते प्रसन्न हास्य...मी मनात म्हटलं, टीव्हीवरचं यांचं रूप आणि प्रत्यक्षातले ते स्वत: यात फक्त आवाज आणि बोलायची ढब याउपर काहीही साम्य नसावं. कोडं सोडवता सोडवता त्यांना काही शब्द अडले आणि एकदमच ते म्हणाले अरे हो तू दिल्लीत लॅन्ग्वेज मॅनेजर म्हणून काम करतोस ना मराठीसाठी, मग तुला हे शब्द माहित असतील. मी प्रयत्न सुरू केला पण माझ्याअगोदर त्यांनीच ते शब्द लिहून काढले आणि त्यांच्या व्यासंगासमोर मी काहीच नाही याची पुन्हा एकदा जाणीव झाली..

परवा त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि मला धक्काच बसला. कदाचित दोनच महिन्यांपूर्वी त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली असल्यामुळे त्या धक्क्याची तीव्रता खूप जास्त होती. खरंतर अजूनही विनय आपटे यांनी एक्झिट घेतल्यावर विश्वास बसत नाहीये. कदाचित त्यांच्या कर्तृत्वाचा भारच ते नाव कायम प्रत्येक मराठी मनावर कोरून ठेवील. आणि इतिहास तर त्यांना कधीच विसरू शकणार नाही.....