Thursday, October 8, 2015

शेवटची रात्र...

शेवटची रात्र...
ठाक्....हातातल्या खड्यांशी खेळत असलेलं ५ वर्षांचं पोर आवाजासरशी दचकलं...आईनं ताडपत्रीचं टोक कठड्यावर ठेऊन त्याच्यावर भलामोठा दगड उचलून ठेवला होता...आई माझी चड्डी भिजतेय..हातातली खडी टाकून पोरगं आई बिलगलं...आईनं पोराला जवळ ओढत त्याची भिजलेली चड्डी झटकल्यासारखं केलं...वाळंल हां बाळा...पोराचं समाधान झालं आणि पोरगं त्या झोपडी नावाच्या प्रकारात कोप-यातल्या गोणट्यावर जाऊन बसलं...परत खड्यांचा खेळ सुरु...
पाऊस पडणार हे लक्षात आल्यावर तिनं ताडपत्री व्यवस्थित पसरली होती..फूटपाथबाजूचा उंच कठडा ते खालचा रस्ता अशी ताडपत्री तिनं लावली होती...भल्यामोठ्या दगडांनी त्या ताडपत्रीला आधार दिला होता...आणि मधल्या त्या त्रिकोणी खोलीत तिचं आख्ख कुटुंबं निजलं होतं...चारच दिवसांपूर्वी नव-याला वेठबिगारीचं मोठं काम मिळालं होतं...शंभर पाट्या विटा वाहून झाल्यावर ठेकेदारानं खूश होऊन नव-याला साईटवरचा भोक पडलेला ताडपत्रीचा तुकडा दिला होता...त्या दिवशी तिनं मोठ्या खुशीत जवळच्या पिशव्यांचं ठिगळ त्या भोकावर लावून शिवलं होतं...आणि पावसाळ्याच्या चार महिन्यांसाठी त्यांच्या घराला छप्पर मिळालं होतं...
आये पानी आलं...पोरगं इवळलं आणि तिची तंद्री तुटली...पोराच्या अंगाखालचं गोणटं ओलंचिंबं झालं होतं...फूटपाथच्या कठड्याला लागून पाणी थेट तिच्या घरात ओघळत होतं..पलीकडचा कोपरा ओलाचिंब झाला होता..तिनं पोराला नव-याच्या बाजूला जागा करून झोपवलं...आणि तीही त्याच्याशेजारी अंगाचं मुटकुळं करून पडली...दिवस संपला...रात्रीचा प्रश्न होता...
ताडपत्रीच्या छप्परावर पावसाच्या पाण्याची टपटप वाढायला लागली तशी तीची धडधडपण वाढायला लागली..तापानं फणफणलेला नवरा तिच्या बाजूलाच झोपला होता...दोन दिवसांपासून ताप उतरतच नव्हता...त्यात आता पावसानं धार धरली होती...जवळच्या होत्या नव्हत्या त्या सगळ्या चिंध्या तिनं नव-याला पांघरून दिल्या होत्या...नव-याला पाणी लागलं तर खेळ खल्लास...छातीत धस्स झालं...
प्लॅटफॉर्म नंबर दो पर आनेवाली लोकल एक बजकर ४८ मिनटकी कसारा जानेवाली धीमी लोकल है...अजून ६ तास...तिनं दीर्घ उसासा सोडला...सकाळी साडेसात वाजता बाजूच्या शेडमध्ये ट्रॅव्हलवाल्यांची बस पार्किंगला लागणार होती...आणि बरोबर १५ मिनिटांनी क्लिनर निघून गेल्यावर तिचं कुटुंबं त्या बसमध्ये मागच्या बाजूला स्थलांतरित होणार होतं...उद्या रात्रीपर्यंत...नेहमीप्रमाणे...पण आज पाऊस तिच्या नव-याच्या जिवावर उठला होता...तिचं कुंकू धुवून काढायला..
बाटली फुटल्याच्या आवाजानं तिला जाग आली...तिनं डोकावून बघितलं... झोपडीजवळ दारू पिलेली दोन माणसं तिच्या अगदी शेजारी वाटावीत इतकी जवळ भांडत होती...त्यातल्या एकानं तिच्या डोक्याजवळच बाटली फोडली होती..तिच्या पोटात गोळा आला...बाजूला झोपलेल्या नव-याकडे तिनं पाहिलं...तिला धीर वाटला...मघाशी आधाशासारखा पडणारा पाऊस आता रिमझिम झाला होता...मादरचोत रात्रीच्या साडेतीन वाजता तुला अंडाभुर्जी खायचीय भाडखाव...बाटली फोडणा-याला दुसरा बेवडा म्हणाला...अजून ४ तास...ती म्हणाली...नव-याच्या तापामुळे गारठ्यातसुद्धा तिला आता उष्ण वाटायला लागलं होतं...
डॉक्टरनं सकाळीच तिला सांगितलं होतं...आज ताप उतरला नाही तर काही खरं नाही...सरकारी दवाखान्यात औषध तर मिळालं, पण नव-याला झोपवायला जागा नव्हती मिळाली...म्हणूनच तर तिनं या झोपडीतच नव-यासाठी वॉर्ड तयार केला होता...तिच्या दोन्ही फाटक्या साड्या खाली आंथरल्या होत्या...नव-याची दुसरी पॅंट आणि चपलांची उशी केली होती...आणि अंगावरची साडी पांघरायला दिली होती...पण एवढ्यावर नव-याचा ताप थांबणार नव्हता...आणि तिच्याकडे पर्याय नव्हता...
भानु...भानु...ए भानु...थंडी वाजतीये गं...भानुsss...नव-यानं मोठ्या कष्टानं मारलेली शेवटची हाक ऐकून तिला जाग आली आणि भीतीचा गोळा तिच्या गळ्याशी आला...नवरा धरणीकंप झाल्यासारखा थरथरत होता...ती झपकन उठून नव-याकडे गेली...झोपडीच्या दुस-या बाजूला ओघळणारं पाणी नव-याकडे सरकू लागलं होतं...तिनं नव-याचा हात हातात घेतला....क्षणभर आगीतच हात टाकलाय की काय असं तिला वाटलं...तिनं भानावर येत कमरेच्या पोटलीतून गोळ्यांचं पाकीट काढलं आणि मडक्यातलं पाणी पाजत नव-याच्या तोंडात गोळी टाकली...काही वेळानं नवरा शांत झाला...
प्लॅटफॉर्म नंबर एक पर आनेवाली लोकल पाँच बजकर ३६ मिनट की मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस जानेवाली धीमी लोकल है...तीचा जीव गळ्याशी आला होता..शेवटचे दोन तास...
पोरगं मध्येच चुळबुळायचं...परत शांत व्हायचं...अंथरलेली साडी तिनं पुन्हा सरळ केली...आणि पोराजवळ जाऊन आडवी झाली...आता तिच्या कानांवर वेगवेगळे आवाज यायला सुरुवात झाली होती..कडक बुटांचे..टाचांच्या सॅण्डल्सचे..करारणा-या चपलांचे...पाण्यात पडणा-या ढांगांचे...रपरपणा-या पावसाचे आणि नव-याच्या कण्हण्याचे...पण ती आतुरतेनं वाट पहात असलेले आवाज काही तिला येत नव्हते...शेडमध्ये लागणा-या बसच्या टायरचे...त्या आवाजापुढे जगातले सगळे आवाज तिला फिके वाटत होते...निरर्थक...निर्जीव...नि:शब्द...आता तर तिला काही ऐकू येईनासंच झालं होतं...नव-याचं कण्हणंही...तिला हात गरम वाटत होता...खूप गरम...खूप खूप गरम..कदाचित नव-याला हात लावल्यामुळे...पण आसपासचा थंडावा ती उष्णता कमी करत होता...आणि तिनंच शिवलेल्या पिशव्यांच्या ठिगळाकडे बघत ती पडली होती...साडीच्या टोकावर...
आय डोण्ट लाईक रेन यार...लुक अॅट माय न्यू सॅण्डल्स..ऑल द टाईम यू हॅव टू कॅरी अम्ब्रेलाज अॅन ऑल यू नो...इट्स डिजगस्टींग...ओह शीट...
महागड्या सॅण्डलमधला तीचा पाय पचकन एका खड्ड्यात पडला...खड्ड्यातलं पाणी शेजारच्याच ताडपत्रीमध्ये पसरलं...पावसाला अस्खलित इंग्लिशमध्ये अजून शिव्या हासडत ती पुढे निघून गेली...खड्ड्यात काय झालं हे बघायला ती मागे वळली...खड्ड्यातल्या पाण्यापेक्षा शेजारच्या ताडपत्रीमध्ये जास्त पाणी होतं...एक लहानसं पोर बापाचा पाय धरून रडत होतं...उकीडव्या बसलेल्या बापानं डोक्याला हात लावून नजर स्थिर केली होती...आणि त्याच्या समोर एक ३०-३२ वर्षांची अंगावर फक्त परकर-पोलकं असलेली तरूण स्त्री वरच्या ताडपत्रीला डोळे लावून पडली होती...खड्ड्यातून पचकन उडालेलं पाणी तिच्या चेह-यावर पसरलं होतं...पण तिला काहीच फरक पडला नव्हता...पडणार नव्हता...

शेजारच्या शेडमधून बसच्या हॉर्नचा कर्कश्श्य आवाज आला.... 



(सदर कथा 'तनिष्क' मासिकाच्या जुलै, २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली आहे)

Tuesday, October 6, 2015

पिंजट म्हातारा...

मृत्यू अटळच असावा
रस्त्यावरच्या फुटलेल्या दगडावर
तोल आत्ता जाईल की नंतर
या भीतीत बसलेला पिंजट म्हातारा स्वत:शीच म्हणाला...
नाहीतरी हल्ली जिवंत रहाण्याचीच भीती वाटते
गडबड, गोंगाट चर्चा पुचाट
सडलेले मेंदू उंची कापडात लपेटून
फिरतात हल्ली गल्लीबोळात
कुजलेल्या नजरा ओंगळवाण्या होऊन
उगाच बघतात त्यांच्याकडे..
कुस्करलेलं शरीर सडक्या जखमा घेऊन
आंधळ्याच्या दारात बसलंय
सावकारानं ओरबाडलेले श्वास
गावाबाहेरच्या माळावर लटकतायत
दमडीसाठी चामडी सोलून काढायला
शिवशिवतायत लाखो हात
भुकेनं गोठलेले निष्पाप जीव
हाडांना कातडं चिकटेपर्यंत जगतायत..जगवले जातायत
पांढरे झालेले केस उगाचच आशेवर बसलेत
बर्फासारख्या गोठलेल्या रक्ताच्या सळसळण्याच्या
पण मुर्दाडलेल्या चरबीमधलं ते रक्त निपचित वाहतंय
नाल्यातल्या घाण पाण्यासारखं
मेलेल्या लाखो जिवांना घेऊन..त्यांची पुढारकी करत
खरंच...मृत्यू अटळच असावा
रस्त्यावरच्या फुटलेल्या दगडावर
तोल आत्ता जाईल की नंतर
या भीतीत बसलेला पिंजट म्हातारा स्वत:शीच म्हणाला...

नाहीतरी हल्ली जिवंत रहाण्याचीच भीती वाटते...