Tuesday, August 4, 2020

कोरोनाहून भयंकर पुरुषी विकृतीचा विषाणू!



गेल्या ७ महिन्यांपासून जगभरात आणि ५ महिन्यांपासून भारतात कोरोना ठाण मांडून बसला आहे. कोरोनाचा कुणामध्येही भेदभाव करत नाही असं म्हणतात. गरीब, श्रीमंत, शहरी, ग्रामीण, शिक्षित, अशिक्षित, लहान, मोठे, वृद्ध, स्त्री, पुरूष अशा सर्वांनाच कोरोना होण्याची सारखीच भिती आहे. त्यातही काही वयोगट फक्त प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनापासून जास्त सुरक्षित असल्याचा दावा जरी केला जात असला, तरी आजपर्यंत जगभरात सापडलेल्या कोट्यवधी कोरोना रुग्णांमध्ये या सर्वच गटातल्या रुग्णांचा समावेश आहे. पण असं जरी असलं, तरी समाजातल्या काही घटकांसाठी कोरोनाचा विषाणू जास्त घातक ठरतो आहे. स्त्रियांना पुरुषांपासून असलेला धोका इतर सामान्य परिस्थितीपेक्षा कोरोना काळात वाढलाय की काय, असंच गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांवरून वाटू लागलं आहे. राजकीय नेतेमंडळींनी यावर काय भूमिका मांडली हा भाग आपण काही काळासाठी बाजूला ठेऊयात. कारण त्या भूमिका किती प्रामाणिक आहेत, यावरच बहुतेक जनतेचा विश्वास नाही! पण यावर या समाजाचा जवळपास ५० टक्के घटक असलेल्या महिला वर्गामध्ये मात्र आता भितीची भावना निर्माण झाली आहे. आणि त्यासाठी कोरोना नसून काही पुरुषी वासनांध मेंदू कारणीभूत झाले आहेत. आणि ते कोरोनापेक्षाही भयानक आहेत!

प्रत्यक्ष कोरोनाची लागण झाल्यामुळे नव्हे, तर त्यासाठी रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये किंवा कोरोना आयसोलेशनमध्ये दाखल झाल्यामुळे महिलांना आता जास्त धोका वाटू लागला आहे. त्याला कारण गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या या घटना. अगदी अलिकडचं उदाहरण घ्यायचं झालं, तर अमरावतीच्या बडनेरामध्ये घडलेली एक किळसवाणी आणि मानसिक विकृती दर्शवणारी घटना. (दुर्दैवाने) महिलांचा विनयभंग, लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्कार या रोजच्या रोज घडणाऱ्या घटनांसाठी सामान्य मन कोडगं झालं आहे. हे कानांना ऐकायला कितीही कटू वाटत असलं, तरी सत्य आहे. पण अमरावतीमध्ये घडलेली घटना किंवा त्यासारख्याच घडलेल्या इतर घटना या बाबतीत वेगळ्या आहेत. कोरोनाच्या उपचारांसाठी किंवा कोरोनामुळे संशयित असलेल्या महिला रुग्ण किंवा महिला संशयितांना त्यांच्या जीवितापेक्षाही त्यांच्या शीलाची काळजी जास्त वाटू लागणं हे या सरकारचं आणि प्रशासनाचं अपयश आहे असं म्हटलं तर त्यात काहीही वावगं ठरणार नाही.

Image Source - TOI


अमरावतीच्या बडनेरा भागात असणाऱ्या मोदी हॉस्पिटलमध्ये एका तरूणीचा कोविड चाचणीसाठी घसा आणि नाकातल्या स्वॅबसोबतच गुप्तांगातला देखील स्वॅब घेतला गेला. कोरोना चाचणीसाठी फक्त घसा आणि नाकातलाच स्वॅब घ्यावा लागतो हे समजल्यानंतर तिने यासंदर्भात तक्रार केली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. संबधित लॅब टेक्निशियनवर गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली हा भाग वेगळा. मात्र, या प्रकारामधून काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि एक समाज म्हणून त्या प्रश्नांचा विचार करण्यासोबतच त्यावर उत्तरं शोधण्यासाठी आणि उत्तरं देण्यासाठीही आपण बांधील आहोत.

हा सगळा प्रकार घडला, ती पीडिता एका प्रतिष्ठित व्यापारी प्रतिष्ठानमध्ये काम करते. त्यामुळे साहजिकच शिक्षण, जाणीव किंवा जागृतीच्या स्तरावर ती अज्ञानी नक्कीच नव्हती. मात्र, अशा तरुणीसोबत देखील असा प्रकार घडला असेल, तर ग्रामीण भागात जिथे शिक्षण, जागृती या सगळ्याच बाबतीत आनंद आहे, अशा ठिकाणी चाचणीसाठी किंवा तपासणीसाठी गेलेल्या महिलांच्या बाबतीत काय घडत असेल, याचा अंदाज लावण्यासाठी मन धजावत नाही. अर्थात, तसं घडलंच असेल, असा जरी आपल्याला दावा करता येत नसला, तरी तसं काही कुठे घडलं नसेलच, असा देखील दावा कुणी छातीठोकपणे करू शकणार नाही. किमान बडनेराच्या घटनेनंतर तरी तसा दावा कुणी करू नये. याशिवाय सरकारमान्य लॅबमध्ये दिवसाढवळ्या असा प्रकार घडतो याचा सरळ अर्थ असा की या प्रक्रियेवर कुणाचंही लक्ष, वचक किंवा नियंत्रण नाही. याआधी किती होतं हा जसा अनुत्तरीत प्रश्न आहे, तसंच यानंतरही किती राहील, हा देखील अनुत्तरीत प्रश्नच राहणार आहे. कारण संबंधित पीडित तरूणीने हिंमत करून या प्रकाराबाबत तक्रार केली, म्हणून किमान हा प्रकार उघडकीस आला. उघडकीस न आलेले देखील अनेक प्रकार असण्याची दाट शक्यता आहे.



हा प्रकार काही फक्त बडनेरापुरताच मर्यादित नाही. त्यामुळे तो आत्ताच घडला किंवा त्यामुळे मोठा गोंधळ झाला असंही काही नाही. तपासणीच नाही, तर चक्क आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधित महिलांवर देखील बलात्काराच्या निर्लज्ज घटना घडल्याचे अनेक प्रकार महाराष्ट्रातही घडलेत, भारतातही घडलेत आणि जगभरात घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या एका महिलेवर तिथेच दाखल झालेल्या दुसऱ्या पुरुषाने बलात्कार केला. आपण डॉक्टर असल्याचं सांगून अंग दुखत असल्याच्या तक्रारीवर या विकृताने महिलेवर मसाजच्या नावाखाली बलात्कार केला. याचा अर्थ या काळात रुग्णालय प्रशासन, आसपासचे रुग्ण, रुग्णालय कर्मचारी या कुणालाही या घटनेची साधी कुणकुण देखील लागली नाही इतक्या शिताफीने तो विकृत हे कृत्य करू शकला. प्रशासकीय हलगर्जीपणाचा हा भीषण नमुना ठरावा. याच महिन्याच्या २४ तारखेला दिल्लीच्या कोविड केअर सेंटरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सेंटरच्या बाथरूममध्ये एका नराधम तरूणाने अत्याचार केले. विकृतीचा कळस इतका की त्या अत्याचाराचा त्यानं व्हिडिओ देखील बनवला. कोरोना चाचणी करण्याच्या नावाखाली राजस्थानच्या रतनगड परिसरात दोघा नराधमांनी एका ३६ वर्षीय महिलेवर रुग्णालयाच्या मागच्या बाजूला नेऊन बलात्कार केला. बिहारच्या गयामध्ये तर आयसोलेशनमध्ये असलेल्या गर्भवती महिलेवर रुग्णालयातल्याच एका कर्मचाऱ्यानं बलात्कार केला. ही यादी अशी वाढतच जाते.

कोरोनासारख्या गंभीर साथीच्या आजाराच्या काळात अशा प्रकारे महिलांमध्ये रुग्णालय, आयसोलेशन सेंटर किंवा कोविड सेंटर्समध्ये जाण्याबद्दल भिती निर्माण होणं हे एकूणच महिलांच्या सुरक्षेसाठीही आणि त्यांच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे. कोरोनाच्या नावाखाली या महिलांची फसवणूक होणं आणि त्यांच्यावर अत्याचार होणं ही बाब जशी गंभीर आहे, तशीच या महिला या अशा प्रकारांबाबत सतर्क नसणं ही देखील गंभीर बाब आहे. आणि याला कारण कोरोनाच्या आजाराचं स्वरूप हेच आहे. आपल्याला ज्या आजाराबद्दल पुरेशी माहिती नाही, ज्या आजारावर आजतागायत औषध किंवा उपचार सापडलेला नाही आणि जो आजार वाढला तर जीवघेणा ठरतोय, जगभरात लाखो लोकं अशा आजारामुळे मरण पावत आहेत, अशा आजाराच्या विषाणूची आपल्याला लागण झाली आहे किंवा होऊ शकते म्हटल्यावर आधीच या महिला घाबरलेल्या असतात. त्यात डॉक्टर किंवा रुग्णालयातील व्यक्तीच त्यासंदर्भात काही सांगत असेल किंवा उपचारांच्या नावाखाली काही करत असेल, तर त्यावर महिलांचा विश्वास बसणं ही साहजिक बाब आहे. त्यामुळे इथे सरकार किंवा प्रशासन या बाबींवर पुरेशी जनजागृती करण्यात अपयशी ठरल्याचंच यातून पुढे येत आहे. स्वॅब फक्त नाकातून किंवा घशातूनच घेतला जातो, इतकी मूलभूत बाब देखील सगळ्यांपर्यंत अद्याप पोहोचू शकलेली नाही हे वास्तव बडनेराच्या घटनेनं समोर आणलं आहेच.



खरंतर दिल्लीमध्ये घडलेल्या घटना, राजस्थानमध्ये घडलेल्या घटना, महाराष्ट्रात पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये घडलेली घटना किंवा अगदी परवाची बडनेराची घटना, या घटना घडल्यानंतर इतर कोणत्याही बलात्काराच्या किंवा महिला अत्याचाराच्या घटनांप्रमाणेच काही दिवस चर्चा होऊन ते विषय मागे पडले. या घटनांमधून महिला सुरक्षा आणि महिलांच्या डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी किंवा आरोग्य यंत्रणेवरच्याच विश्वासाला तडा गेला आहे. कोरोनाच्या काळात तर रोज नव्याने वाढलेले रुग्ण आणि कोरोनावरच्या लसींच्या शोधाचे किंवा संशोधनातल्या प्रगतीचे मुद्दे रोज नव्याने चघळले जात असताना कोरोनाच्या पडद्याआड महिलांवर झालेल्या (किंवा भयंकर अंदाजाने होत असलेल्या) घटनांविषयी ठोस पाऊल उचलणं आणि त्या घडू नयेत म्हणून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं नितांत आवश्यक झालं आहे. कारण कोरोनाचा विषाणू हे फक्त या वर्षीचं संकट आहे. त्यावर प्रतिबंधात्कम लसीची आपण सगळेच वाट पाहात असताना ती नजीकच्या भविष्यकाळात येईलही. पण पुरूषी विकृतीचा हा विषाणू आज समाजातल्या अनेक पुरुषांमध्ये भिनलाय, त्यावर प्रतिबंधात्मक उपचार गेल्या शेकडो वर्षांमध्ये सापडलेले नाहीत. कोरोनावर उपचार शोधणं ही जशी संशोधकांची आणि वैज्ञानिकांची जबाबदारी आहे, तशी या विकृतीच्या विषाणूवर उपचार शोधणं ही समस्त मानवजातीची जबाबदारी आहे!

Friday, July 17, 2020

भूकबळी की कोरोनाबळी! चॉईस इज युअर्स!

Maharashtra lockdown Mumbai lockdown

संयुक्त राष्ट्र अर्थात United Nations चा The State of Food Security and Nutrition in the World 2020 हा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जगभरात मोठ्या प्रमाणावर भूकबळी आणि गरिबी वाढू लागली आहे. त्यामुळे २०२० या एका वर्षातच जगभरात ८.३ ते १३.२ कोटी लोकं अल्पपोषित किंवा कुपोषित राहण्याचा अंदाज आहे. हे वाचायला फक्त आकडे असले, तरी याचा अर्थ इतक्या मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढणार आहे. कोरोनामुळे जगभरात झालेल्या आणि होणाऱ्या मृत्यूंपेक्षा हा आकडा १०० हून जास्त पटींना मोठा आहे! त्यामुळे लॉकडाऊनमध्ये घरात बसून राहणं आणि उद्योगधंदे बंद ठेवणं यामुळे किती नुकसान होऊ शकतं, याचं भीषण वास्तवच या आकडेवारीनं समोर आणलं आहे. या परिस्थितीत बाहेर पडलो तर कोरोनामुळे कदाचित बाधित होऊ, पण घरात बसून राहिलो तर उपासमारीने हमखास गाळात जाऊ, या निर्णयाप्रत लोकं आले आहेत.

'आपली तयारी आहे कोरोनासोबत जगण्याची, पण कोरोनाची तयारी आहे का आपल्याला त्याच्यासोबत जगू द्यायची?' खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हे वाक्य! कोरोनाच्या काळात त्यांनी लोकांना उद्देशून जी काही फेसबुक लाईव्हं केली, त्यातल्या एका लाईव्हमधला हा सर्वात चर्चेत राहिलेला डायलॉग! चर्चेत यासाठी कारण या डायलॉगवरून प्रचंड मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. कोरोनाशी संबंधित इतर सर्व मुद्द्यांवर ज्या प्रमाणे विनोद झाले, त्याचप्रमाणे याही गोष्टीवर विनोद झाले. गेल्या ६ महिन्यांपासून कोरोना देशात ठाण मांडून बसला आहे. जसे कोणत्याही नव्या सरकारसाठी पहिले ६ महिने हनिमून पिरियड म्हटले जातात, तसेच पहिले तीन महिने जणूकाही कोरोनासाठीही आणि लोकांसाठीही हनिमून पिरियडसारखेच गेले. चेष्टा, मस्करी, विनोद, टाईमपास, लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होमची मजा, वेगवेगळ्या रेसिपी, नवनवे प्रयोग, व्हिडिओ कॉलिंगला आलेला ऊत, झूमवरचे बक्कळ इंटरव्यू-मीटिंगा असं सगळंकाही या पहिल्या तीन महिन्यात अगदी धमाल आणि नेहमीच्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी वेगळं म्हणून लोकांनी एन्जॉय देखील केलं. पण पहिल्या तीन महिन्यातला हनिमून आता ओसरला असून खरा भीषण कोरोना समोर आला आहे. पण आपल्याला त्याच्यासोबत जगू द्यायची तयारी नसलेल्या कोरोनाची बखोटी धरून त्याच्या मानगुटावर बसून, प्रसंगी गळ्यात गळे घालून लोकांनी त्याला अंगवळणी पाडून घेतला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नाका-तोंडाला हात लावायचा नाही इथपर्यंत ठीक होतं. पण सकाळ-दुपार-रात्र असं दिवसातून तीन वेळ हाता-तोंडाची गाठ घालण्यासाठी लोकांपुढे कोरोनाला शिंगावर घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही. आणि त्यांनी ते घेतलंही!

कोरोनाचं मोठं विलक्षण चित्र सध्या देशात आणि महाराष्ट्रात दिसतंय. जेव्हा इथे दिवसाला तीन अंकी रुग्ण सापडायचे, तेव्हा सगळी जनता घरात कुलूपबंद करून ठेवल्यासारखी मारून मुटकून कोंडून ठेवली. आता दिवसाला चार अंकी रुग्ण सापडतायत आणि तीन अंकी रुग्णांचा मृत्यू देखील होतोय, पण आता मात्र अनलॉक आणि मिशन बिगीन अगेन म्हणत गाड्या, बायका, माणसं, पोरं-टोरं, विमान असं सगळं बाहेर पडलंय. नव्हे, सरकारला ते पाडावं लागलंय. सुरुवातीच्या तीन महिन्यांत लोकांना घरात बसा म्हणून विनवावं लागत होतं, ते शारिरीक आरोग्यासाठी..आता लोकांना आपली काळजी घेऊन घराबाहेर पडण्याचं आवाहन करावं लागतंय, ते आर्थिक आरोग्यासाठी. अनलॉक १.० किंवा मिशन बिगीन अगेनची ऑफिशियल घोषणा होण्याआधीच जनमानसाचा निर्धार झाला होता. त्यांच्यासाठी मिशन बिगीन अगेन केव्हाच सुरू झालं होतं. त्यामुळे जिवावर उदार होऊन त्यांनी आपापल्या घरांचे उंबरे ओलांडले होते.

lockdown

आज बाहेर फिरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं की तुम्ही बाहेर का फिरत आहात, तर त्याच्याकडून काही ठराविक आणि कॉमन अशी उत्तरं मिळतील. पहिलं म्हणजे 'काही पर्याय आहे का?', दुसरं 'घरात किती दिवस बसून राहणार? शेवटी कुठेतरी सुरु करावंच लागेल ना?' आणि आताशा सुरू झालेलं तिसरं उत्तर म्हणजे 'आता बाहेर पडावंच लागेल, बघू काय होतंय ते'! लोकांनी कोरोनाला आता शिंगावर घेतलंय. तोंडाला मास्क लावून का होईना, दिवसातून शंभर वेळा हातावर सॅनिटायझर लावून का होईना, घरात आल्यानंतर वस्तूंना सॅनिटायझरने आणि स्वत:ला गरम पाण्याने आंघोळीचे सोपस्कार पार पाडून का होईना पण लोकांनी आता कोरोनाचं मानगुट पकडून कामधंदा सुरू केला आहे. शेवटी माणूस कितीही पैसेवाला असला किंवा कितीही गरीब असला, तरी त्यानं कामकाज सुरू करणं हे इतरांसाठीही आवश्यक असतंच. आपल्या आर्थिक संरचनेत सगळेच इतके परस्परावलंबी झालेत की यातला एक कुठला घटक गायब झाला, की त्याचा परिणाम दुसऱ्याच्या आयुष्यावर व्हायला लागतो. श्रीमंत माणूस सगळं बंद करून घरात बसला की त्याच्या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीयांवर संकट येतं. आणि कामगार वर्ग घरी बसला की त्यांच्यावर अवलंबून असलेला मालक वर्ग संकटात येतो. त्यामुळे या प्रत्येक घटकाला घराबाहेर पडणं त्यांच्या स्वत:साठीही आणि व्यापक आर्थिक-सामाजिक हितासाठीही गरजेचं होतं.

हल्ली कोरोनाची लस असं कुठेही ऐकलं, वाचलं किंवा पाहिलं की झाडून सगळ्यांचे डोळे, कान (आणि काहींचं नाकही! बातमीचा वास असणारे!) लगेच टवकारले जातात. सगळ्यांनाच त्याची प्रतिक्षा आहे. पण जगभरातल्या ७० हून जास्त संस्था कोरोनाच्या लसीचा मागोवा घेत असताना कुणालाही लस यशस्वीरीत्या बनवण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण करता आलेली नाही. अनेक तज्ज्ञांनी असं स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की २०२१च्या आधी कोरोनाची लस येण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे अनेकांनी २०२० हे वर्ष आयुष्यात ब्लॅक इयर म्हणून जाहीर देखील करून टाकलं आहे. पण म्हणून कोरोनाच्या लसीच्या प्रतिक्षेत घरात बसून राहणं परवडणारं नाही. त्यामुळे लस येईल तेव्हा येईल, पण आपण कामाला लागा, होईल ते होईल, अशा मानसिक स्थितीपर्यंत सर्व येऊन पोहोचले आहेत.

Moderna COVID-19 vaccine

लोकांचे जीव घेणाऱ्या आजारावर संशोधन असलेल्या लसीची प्रतिक्षा जरी सगळ्यांना असली, तरी त्यासाठी कुणी हवालदील झाल्याचं चित्र अजून तरी दिसत नाहीये. लोकांनी आता परिस्थिती स्वीकारली आहे. जे आहे ते असं आहे आणि यातूनच मार्ग काढायचा आहे याची व्यापक जाणीव कोणत्याही सामाजिक जनजागृतीशिवाय किंवा कुणीही सांगितल्याविना आपोआप उत्स्फूर्तपणे आली आहे. त्या अर्थाने गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, रोजंदारीवरचे, एसी ऑफिसातले, सरकारी नोकरीतले, खासगी कंपन्यांत घाण्याला जुंपलेले असे सगळेच कोरोनानं एकाच रांगेत आणून बसवले आहेत. सगळ्यांना लागण होण्याची सारखीच शक्यता. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधले बेड्स आता सरकारी ताब्यात असल्यामुळे सगळ्यांवर उपचार होण्याचीही सारखीच शक्यता (खासगी रुग्णालयांमधले लाखोंच्या बिलांचे २० टक्के बेड्स वगळता!). आणि मृत्यूचं म्हणाल तर ते पूर्णपणे आपल्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून! ज्या देशातली लस यशस्वी होईल, त्या देशातल्या नागरिकांना प्राधान्याने ती मिळणार. त्या गणितानुसार २०२१च्या सुरुवातीला जरी लस आली, तरी ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला आख्खं २०२१ हे वर्ष जायचीच शक्यता जास्त. त्यामुळे जी गोष्ट पुढच्या वर्षभरात आपल्या आसपासही फिरकण्याची शक्यता नाही, अशा गोष्टीच्या भरवशावर आपलं सगळंच सोडून देणं म्हणजे आपणच आपला नाश करून घेण्यासारखं आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या आधी उपासमारीनेच जीव जाण्याचा धोका जास्त आहे!

शेवटी आपण कोरोनासोबत जगायला तयार झालो काय किंवा कोरोना आपल्यासोबत जगायला तयार झाला काय, यात फायदा किंवा नुकसान कोरोनाचं काहीच होणार नाही. जे होणार ते आपलं होणार! घराबाहेर पडलेली सगळीच लोकं काही नियम मोडायला किंवा घरात कंटाळा आला म्हणून किंवा फिरायला म्हणून बाहेर पडलेली नाहीत. काही अपवाद असतीलही. पण व्यापक अर्थाने विचार केला, तर यातल्या बहुतेकांना हाता-तोंडाची गाठ घालण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. जिथे ८-१० लोकांचा मृत्यू झाला तरी गहजब होऊन वृत्त-प्रसारमाध्यमांमध्ये मोठमोठाले मथळे व्हायचे, तिथे दिवसाला शेकडो लोकांचे मृत्यू होऊनही फक्त वाढलेल्या 'काऊंट'मध्ये त्याची गणना होतेय. मात्र, अशा परिस्थितीतही जेव्हा कुणी काम-धंदा सुरू करतो, तेव्हा या सर्व भितीच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी घडू लागल्या आहेत हे समजून जावं!

संयुक्त राष्ट्राचा सविस्तर अहवाल - https://sustainabledevelopment.un.org/index.php?page=view&type=20000&nr=6909&menu=2993

Saturday, June 20, 2020

मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी!



एक गाव...मध्यरात्री सगळे डाराडूर असताना अचानक किचकिचाट, गडबड, गोंधळ झाला आणि खाडकन् सगळ्यांची झोप उडाली..काही डोळे चोळत उठले, तर काहींची थोबाडं सुजली म्हणून उठले...घराघरातून सगळेच आवाजाच्या दिशेनं धावत सुटले..गर्दीत एकटे पडू नये म्हणून गर्दीचा भाग होऊ लागले...स्वत:ही निरनिराळे आवाज काढून बोमट्या मारू लागले...घटनास्थळी पोहोचले तेव्हा एका घरात दरोडा पडल्याचं दिसलं..सगळं लुटल्यामुळे घर आता मोकळं झालं होतं...गर्दीत त्या घरावरून रोज जाणाऱ्यांसोबतच लांबून कधीतरी कुणी आपल्या घराच्या गच्चीवरून नजर टाकताना त्याही घरावर चुकून नजर गेलेली मंडळीही होती...त्या घरात जाऊन चहापानी करून आलेली जशी होती, तशीच त्या घराच्या पाण्यावरही वाकडं तोंड करून बहिष्कार घातलेली होती...भकभकून उजाडल्यानंतर मोठ्या सायबानं जाहीर केलं, दरोडा पडलेल्या घराला नुकसानभरपाई मिळणार! झालं...आख्ख्या गावात घराघरात पडलेल्या दरोड्याच्या सुरस कथा सुरू झाल्या, ऐकवल्या आणि चघळल्या जाऊ लागल्या... हळूहळू गावातल्या मंडळींची त्यांच्या कथांमधून त्यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यासाठी सायबाच्या कचेरीत रीघ लागली... काही हात धुवायला, तर काही हात शेकायला... आता सायबाला प्रश्न पडला की कुठल्या गावकऱ्यावर विश्वास ठेवावा आणि कुठल्याची कथा कल्पना म्हणून सोडून द्यावी! बॉलिवुडची गत सध्या या गावासारखी झाली आहे!

आठवड्याभरापूर्वीपर्यंत हे बॉलिवुड नावाचं गाव एकदम सुशेगात नांदत होतं. सर्व काही स्थिरस्थावर ज्याच्या त्याच्या ठिकाणी सुखेनैव होतं. हसणाऱ्या पार्ट्या, भिडणारे खांदे, साजरे होणारे १००-२००-३०० कोटींचे पल्ले, गुपचुप चघळले जाणारे गॉसिप, जाहीरपणे दिसणारं प्रेम, डीजे बुलाव गाना बजाव धमाका असं सगळं सगळं होतं. बाहेरून बघणाऱ्यांना सगळं कसं छान छकोर शब्दश: चंदेरी वाटत होतं. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये या चंदेरी सृष्टीतले काही तारे निखळले, तरी ती दुनिया तिचा साज लेवूनच उभी होती. पण सुशांत सिंह राजपूत नावाचं एक वादळ या गावात घोंगावलं आणि तो साज तिची लाज चव्हाट्यावर आणेपर्यंत टराटरा फाटला. याआधी देखील इंडस्ट्रीमध्ये सिनेतारक-तारका किंवा पडद्यामागच्या हातांनी आत्महत्येचं पाऊल उचललं नव्हतं असं नाही. जसं वादळ जिया खानच्या वेळी उठलं, तसंच वादळ प्रत्युषा बॅनर्जीच्या वेळीही आलं, तसं ते कुशल पंजाबीच्या वेळीही आलं. पण यावेळच्या वादळात या दुनियेतल्याच गावकऱ्यांनी तिचा साज फाडून तिचं दुसरं रूप लोकांसमोर आणायला सुरुवात केली. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडची ही काळी किनार अधिक काळी कुळकुळीत आणि ठळकपणे समोर यायला लागली.

खरंतर सुशांतसिंह राजपूरच्या आत्महत्येमागचं वास्तव अजूनही समोर यायचं आहे. पोलिसांचा तपास पूर्ण व्हायचा आहे. खरंच सुशांतवर इंडस्ट्रीचं प्रेशर होतं, की त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या तणावातून त्यानं आत्महत्या केली की अगदी टोकाचा तर्क म्हणजे त्याची कुणी हत्या केली आणि ती आत्महत्या भासवली? तर्क-वितर्क असंख्य असू शकतील. ना सुसाईड नोट ना इतर कुठली स्पष्ट कारणं असल्यामुळे पोलिसांनाही अजून या तपासाची नेमकी दिशा समजलेली नाही. पण या घटनेमुळे बॉलिवुड मात्र वेगळ्याच दिशेने वाहू लागलं आहे. ज्या बॉलिवुडमधून आजपर्यंत चित्रपटांनी कमावलेला गल्ला, उभारलेले मोठमोठाले सेट, शहेनशाह-चॉकलेट बॉय-झिरो फिगर-बोल्ड अॅण्ड हॉट असल्याच गप्पा ऐकायला मिळायच्या, तिथे आज एक नवीन मी टू सुरू झालं आहे!

पोलिसांचा तपास आणि त्याचा निष्कर्ष येण्याआधीच बॉलिवुडमधल्या सेलिब्रिटी मंडळींनी सो कॉल्ड अर्थात तथाकथित बिग शॉट्सवर निशाणा साधून ही मंडळी कसं इतर छोट्या माशांना खाऊन या समुद्रातली बडी मछली झाली आहेत, यावर सोशल मीडियावर लंब्याचौड्या पोश्टी आणि व्हिडिओबाजी करायला सुरुवात केली. कुणी काही अज्ञात वर्षांपूर्वी त्यांच्या झालेल्या बुलिंगबद्दल बोलायला लागलं, तर कुणी आपल्या संपलेल्या करिअरबद्दल आकांडतांडव करायला लागलं. कुणाला आपल्या वेळेआधीच संपलेल्या करिअरची जाणीव झाली तर कुणाला गायन क्षेत्रात होणाऱ्या भावी आत्महत्यांचा आत्ताच साक्षात्कार झाला! थोबाड फुटल्यासारखा गाव जागा झाला आणि आवाजाच्या दिशेनं ओरडत सुटला!

अनुराग कश्यप या प्रथितयश बॉलिवुड सेलिब्रिटीचा भाऊ अभिनव कश्यपने त्याचं करिअर सलमान खान अॅण्ड फॅमिलीने संपवल्याचा दावा केला. अभिनेत्री कंगणा राणावतने पुन्हा एकदा तिच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. अभिनेत्री आयेशा टाकियाने तिला सामना करावा लागलेल्या बुलिंगबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भलीमोठाली पोस्ट टाकली. साहिल खान नावाच्या एका अभिनेत्याने आपलं अभिनेता म्हणून करिअर कसं संपवलं गेलं, याबद्दल अचानक भरभरून बोलायला सुरुवात केली. बिग बॉस नावाच्या एका रिअॅलिटी शोच्या १३व्या सीजनमध्ये दिसलेला अभिनेता अरहान खान डिप्रेशनमध्ये असल्याचं त्याच्या प्रवक्त्याने जाहीर केलं. गायक सोनू निगमने तर या सर्वावर कडी करत भविष्यात संगीत विश्वातूनही आत्महत्यांच्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील, असं जाहीरही करून टाकलं. गाव रांगेत लागला!

गेल्या वर्षी अशीच एक मीटू चळवळीची लाट उठली होती. त्याची सुरुवात जरी परदेशातून झाली असली, तरी बॉलिवुडमध्ये त्याची सुरुवात झाली ती एकेकाळची बॉलिवुड अभिनेत्री आणि सध्या परदेशात वास्तव्यास असलेली तनुश्री दत्ता हिच्यापासून. तिने थेट नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला. प्रकरण प्रचंड गाजलं. त्यामागून अनेक अभिनेत्रींनी असे मीटू हॅशटॅगवर आपले अनुभव सांगितले. त्यातून काहींची हातातली काही कामं, काही शो गेले. पण याऊपर त्याचं काही झालंय असं अजिबात दिसलं नाही. सर्वात विशेष म्हणजे, ज्या तनुश्री दत्ताच्या आरोपांवरून याला बॉलिवुडमध्ये सुरुवात झाली होती, त्या प्रकरणात अद्याप कळलं नाही की नक्की खरं कोण बोलत होतं? ते वादळ जसं उठलं, तसंच शांतही झालं. इंडस्ट्री पुन्हा सुखेनैव सुरू झाली! त्या त्या कलाकार, गायक, संगीतकार, अभिनेत्यांचं आयुष्य जस्ट फॉर चेंज इतकं हललं आणि पुन्हा स्थिरस्थावर झालं. सध्या बॉलिवुडमध्ये हेच मीटू नव्या प्रकारात अवतरलं आहे. पण त्याचा परिणाम तोच होईल की अजून काही?

बॉलिवूडमधल्या खूप मोठमोठ्या नावांवर सध्या आरोप होत आहेत. या नावांची जी काही लार्जर दॅन लाईफ प्रतिमा लोकांच्या, त्यांच्या चाहत्यांच्या, बॉलिवुडमधल्या सहकलाकारांच्या किंवा इतर मंडळींच्या मनात होती, त्या प्रतिमेला आता मोठमोठाले तडे जाऊ लागले आहेत. या आरोपांमधून बॉलिवुड नावाच्या या चंदेरी गावाची अजून एक काळी बाजू समोर येऊ लागली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात नक्की काय झालंय, हे बाहेर येईल तेव्हा येईल, किंवा कदाचित ते कधीच येणार देखील नाही. पण त्याच्या मागून बॉलिवुडचा हा अंधारातला चेहरा आता उजेडात येऊ लागला आहे. आणि तो चेहरा जर आरोप करणाऱ्यांच्या दाव्यांप्रमाणेच भीषण आणि काळाकभिन्न असल्याचं सिद्ध झालं, तर मात्र त्याची मोठी किंमत या नावांना चुकवावी लागेल. पण आजवरच्या अशा अनेक प्रकरणांमध्ये ती चुकवावी लागणार नाही, याची पुरेपूर काळजी ही मंडळी घेत आलेली आहेत.

खान, भट्ट, कपूर आणि या सर्व बॉलिवुडमधल्या ऐरावती घराण्यांसोबत फिल्म्स करणारा करण जोहर हे सध्या टार्गेटवर आहेत. जणूकाही ही मंडळी बॉलिवुडमधली खरी व्हीलन असल्याचाच भास आता होऊ लागला आहे. जो उठतोय तो या सगळ्यांना टार्गेट करून आपल्यावर कसा अन्याय झाला होता, याचे दाव्यांमागून दावे करतोय. कदाचित येत्या काही काळात या सर्व व्हीलनच्या रांगेत अजून काही नावं समाविष्ट होतील. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे. यातलं कुणीही ते करत असलेल्या आरोपांच्या पुराव्यादाखल काहीही सादर करत नाहीयेत किंवा करू शकत नाहीयेत. त्यामुळे आता लोकांसमोर प्रश्न पडला आहे की कुठल्या आरोपांवर विश्वास ठेवावा आणि कुठले फक्त आपली भडास काढण्याची संधी म्हणून केलेले काल्पनिक दावे म्हणून सोडून द्यावेत? गावकरी प्रचंड आकांडतांडव करतायत आणि सायबाकडे हा सगळा तमाशा फक्त बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही!