Thursday, March 14, 2019

पान...



अजून एक पान पलटलं...
त्याच्यावरच्या शाईसह...
बऱ्या-वाईट बोलांसह..
आखीव-रेखीव आकड्यांसह..
परिच्छेद आणि वाक्यांसह...
काना, मात्रा, वेलांट्यांसह...
अर्थ आणि अनर्थांसह...
शब्द आणि शब्दार्थांसह...
कुठे आकड्यांचा काटेकोरपणा...
तर कुठे अक्षरांचा वळणदारपणा
कुठे मात्र्यांचा डोईजडपणा..
तर कुठे उकारांची नतमस्तकता..
कुठे जोडाक्षरांचा मनमिळाऊपणा..
तर कुठे पोटफोड्यांचा तुटकपणा...
काळाची धूळ अंगावर घेऊन...
चिक्कार ठिकाणी दुमडलं जाऊन
कोपरे फाटून किंवा झडून...
एक दिवस पलटलोच जाणार,
हे नशीब माहीत असून सुद्धा...
मोठ्या हिंमतीनं पुस्तकाला
घट्ट चिकटून राहिलेलं...
आणि कधीही पुसले जाणार नाहीत,
असे शब्द अंगावर झेलून...
अजून एक पान पलटलं...
मागच्या पानाची सोबत करायला...
आणि पुढच्याची वाट पाहायला...

- प्रविण वडनेरे (१ जानेवारी २०१८)