Monday, February 1, 2021

हा कोरोना किती लाच घेतो हो?

चहाच्या ठेल्याच्या उद्घाटनासाठी देखील माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष जातात!

सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे… कोरोनाच्या अगदी सुरुवातीपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांपर्यंत झाडून सगळ्यांनी कोरोनापासून बचावासाठी या त्रिसूत्रीचा कंठरवाने उल्लेख केला आहे. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही, तोपर्यंत याच त्रिसूत्रीच्या जोरावर कोरोनाचा पराभव शक्य आहे हे वारंवार आणि वेळोवेळी जनतेच्या मानवर ठसवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे कोरोनाची लस किंवा ही त्रिसूत्री, याशिवाय कोरोनापासून वाचण्याचा तिसरा कोणताही मार्ग किंवा उपाय नाही, याबद्दल सामान्यांच्या मनात अजिबात शंका उरली नाही. प्रत्येकजण एक तर लसीची वाट पाहू लागला किंवा त्रिसूत्रीचं पालन करण्याचा प्रयत्न करू लागला. सरकारकडूनही आपत्कालीन कायद्यांतर्गत कारवाईची भीती घातली जाऊ लागली. पण या दोन्ही उपायांखेरीज, कोरोनाला लांब ठेवण्याचा अजून एक उपाय आहे हे सामान्यांपासून लपवलं गेलं आहे. त्याचा साक्षात्कार आता सामान्यांना होऊ लागला आहे. कारण हा कोरोना लाचखोर आहे!

हे वाचून खरंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय भलतंच. एक डोळ्यांनाही न दिसणारा विषाणू लाच कशी घेऊ शकेल? पण सत्ताधारी, विरोधक, प्रशासक अशा सगळ्याच नेतेमंडळी आणि अधिकार्‍यांच्या वर्तनातून तरी हेच दिसून येत आहे. कोरोना जर लाच घेत नसता, तर या मंडळींचे मोठमोठाले भारंभार गर्दीचे कार्यक्रम बिनबोभाटपणे पार पडते ना! त्यामुळे या सर्व मंडळींनी कोरोनाला नक्कीच लाच दिली असणार! त्यामुळेच यांनी सगळे नियम मोडले जरी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जरी, मास्क घालणं टाळलं जरी किंवा वेळोवेळी हात धुण्याचा त्यांना विसर पडला जरी, तरी कोरोना काही त्यांच्या जवळदेखील फिरकायचा नाही, याची त्यांना निश्चितपणे खात्री असणार!

२२ डिसेंबरपासून राज्यभरातल्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला. त्याच्याच दोन दिवस आधी पुण्यात एक जंगी विवाह सोहळा पार पडला. आणि हे लग्न होतं भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचं. पुण्याच्या शुभारंभ लॉन्समध्ये संध्याकाळच्या वेळी हा सोहळा पार पडला. खरंतर सरकारी नियमानुसार लग्नसमारंभात जास्तीत जास्त २०० लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून. सामान्य माणसांच्या लग्नकार्यात या नियमांचे दाखले देऊन कारवाया केल्या जात असताना आणि अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल केले जात असताना केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या एका आमदाराचा असा जंगी सोहळा अगदी बिनबोभाटपणे पार पडू शकतो, हे सगळ्या जनतेनं पाहिलं.

विशेष म्हणजे या सोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हजर होते. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, हर्षवर्धन पाटील, गिरीश बापट, सुभाष देशमुख, निलेश राणे असे अनेक भाजपचे ज्येष्ठ-श्रेष्ठ-वरीष्ठ नेतेमंडळी हजर होते. कोरोनावरच्या उपाययोजनांबद्दल राज्य सरकार किती बेजबाबदारपणे वागत आहे या मुद्द्यावरून लागोपाठ पत्रकार परिषदा घेऊन टीका करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या लग्नात मास्क न लावता गर्दीमध्ये वधूवरांसोबत फोटो काढत अत्यंत ’जबाबदार’ वर्तन करताना दिसले!

बरं आपण अशा पद्धतीने परवानगी नसताना आपण गर्दी करून, सगळ्या नियमांची दारू करून फटाक्यांमध्ये उडवून दिलेली असताना त्याचं जाहीर प्रमोशन करण्यात देखील ही मंडळी मागे हटली नाही. त्यामुळे त्यांनी तोडलेल्या नियमांचे पुरावे त्यांनी स्वत:च ट्वीटरवर टाकले आहेत. लग्नानंतर चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी विनामास्क काढलेले फोटोच ट्वीटरवर शेअर केले आहेत!

विरोधकांनी अशा प्रकारे ‘भरीव’ लग्नसोहळ्यामध्ये जाहीरपणे कोरोनाला फुटबॉलसारखं लाथेनं उडवून लावल्यानंतर सत्ताधार्‍यांकडून किमान शहाणपणाची अपेक्षा होती. कारण शेवटी कोरोना काळात सामान्य जनतेने पाळायचे एकूण एक नियम सत्ताधार्‍यांनीच बनवले होते. त्यामुळे त्यांच्याकडून ‘जबाबदार’ वर्तन पाळलं जाईल असं वाटत असतानाच नाशिकमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा याहून जंगी लग्नसोहळा शहरातल्या बालाजी लॉन्समध्ये 4 जानेवारीला पार पडला. हे आमदार होते दिलीप बनकर. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याच गोटातले समजले जाणार्‍या दिलीप बनकर यांचं लग्न म्हटल्यावर अजित पवारांची त्यासाठी उपस्थिती अनिवार्यच होती. त्यांच्यासोबत नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकप्रतिनिधी मंडळी या लग्नाच्या गर्दीत शक्य तितकी भर घालण्यासाठी हजर होती. इतकंच नाही, तर ज्यांच्यावर सरकारचे निर्णय लागू करण्याची जबाबदारी असते, ते मोठमोठे प्रशासकीय अधिकारी देखील या लग्नाला ‘जबाबदारी’ने हजर होते! सगळ्या विशेष बाब म्हणजे हजारोंच्या गर्दीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्यावर नंतर राम सातपुतेंच्या लग्नाचे फोटो लाईक आणि शेअर करणार्‍या भाजपने टीका केली! नियम मोडण्यात देखील ‘तुम्ही शेर तर आम्ही सव्वाशेर’, असंच सत्ताधार्‍यांनी ठरवलं होतं की काय? असा प्रश्न या लग्नाच्या निमित्ताने नाशिककरांना पडला असावा!

या लग्नाच्या ५ ते ६ दिवस आधीच नाशिक मध्यच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावर एका समस्येबाबत पोलीस स्थानकावर १० ते १२ महिलांना घेऊन गर्दी केली म्हणून त्यांच्याविरोधात आपातकालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पण तोच कायदा या लग्नासाठी लागू करण्यासाठी मात्र नाशिकचे पोलीस आयुक्त आणि नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्यामध्ये टेनिस कोर्टचा सामना रंगला आहे. कारवाई तर सोडा, पण या घटनेवर भाष्य कोण करणार, यावरून देखोली दोघांमध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे. पुण्यात झालेल्या लग्नसोहळ्यावर पुणेकरांनीच आवाज उठवल्यानंतर तातडीने पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले. पण लग्नाला दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.

या दोन घटना फक्त प्रातिनिधिक म्हणता येतील अशा आहेत. आपल्या आसपास अजूनही बड्या धेंडांची प्रचंड गर्दी असलेली लग्नकार्य, पक्षप्रवेशाचे कार्यक्रम, निवडणुकांच्या प्रचारसभा, जाहीर सभा आणि इतर अनेक कार्यक्रम बिनबोभाटपणे पार पडत आहेत. मात्र, केवळ काही ‘कनेक्शन्स’च्या जोरावर नियम पायदळी तुडवून असे कार्यक्रम घेण्याचं धारिष्ठ्य या नेतेमंडळी आणि त्यांच्या लागेबांध्यांमध्ये येत आहे. पण दुसरीकडे सामान्यांना मात्र कायम मानेवर नियमांची टांगती तलवार ठेऊनच वावरावं लागत आहे. त्यामुळे इतर बाबतीत कायम पडणारा प्रश्न कोरोनासारख्या महाभयंकर जीवघेण्या विषाणूचा सामना करताना देखील आता पडू लागला आहे. सर्व नियम आणि बंधनं फक्त सामान्यांसाठीच आहेत का? किंवा सर्व नियम आणि बंधनं फक्त सामान्यांसाठीच का आहेत? आणि या दोन्ही प्रश्नांसाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसोबतच प्रशासन देखील तितकंच उत्तरदायी आहे. दिल्लीत झालेल्या तबलिगींच्या कार्यक्रमातून कोरोना पसरल्याचा कांगावा करत रान उठवणारी मंडळी आता का चिडीचूप बसली आहेत? मुंबईत सर्वांसाठी लोकल सुरू न करण्यासाठी गर्दीमुळे कोरोना वाढण्याचं कारण देणारे सत्ताधारी अशा कार्यक्रमांचा पत्ता कोरोनाला माहितीच नसतो अशा आविर्भावात का वागत आहेत? कोरोनावरून सरकारचा पिच्छा पुरवणारे विरोधक अशा कार्यक्रमांमध्ये हारतुरे आणि गळाभेट का स्वीकारत आहेत?

खरंतर सामान्यांना गृहीत धरण्याची वृत्ती काही आजची नाही. तसंच, एका विशिष्ट वर्गाला नियमांमधून मोकळीक देण्याचे प्रकार देखील नवे नाहीत. पण किमान कोरोनासारख्या भीषण प्रकाराचं गांभीर्य ठेऊन तरी या मंडळींनी जबाबदारीचं भान ठेवायला हवं. आणि अशा बेजबाबदार वर्तनावर करडी नजर ठेऊन त्याला वेळीच आवर घालण्याच्या कर्तव्याचा प्रशासनाला विसर पडता कामा नये. तो जर पडला, तर पैशाने सारंकाही विकत घेता येतं, या सूत्रावरचा सामान्यांचा भरवसा अधिकच दृढ होईल. आणि या बड्या धेंडांनी कोरोनालाही लाच देऊन खरेदी केलंय की काय? असा प्रश्न ते विचारू लागतील! त्याचंही उत्तर मिळणार नाही, हेही गृहीतच!


No comments:

Post a Comment