Friday, April 13, 2018

ही माणसं अशी का असतात गं अम्मी?



ही माणसं अशी का असतात गं अम्मी?

अम्मी..मी रडले..फाटले..तुटले..फुटले...पण त्याला काहीच वाटलं नाही गं...भाईजान सारखाच दिसत होता तो..पण तो माझ्यावर फक्त ओरडत होता..मी त्याला काहीच केलं नाही..काहीच बोलले पण नाही..पण तरी तो मला मारत होता..अम्मी का गं?

त्या दिवशी तुला आठवतं का गं काय झालं होतं अम्मी? तू मला काहीतरी सांगत होतीस..पण मी तशीच बाहेर पळाले..काय सांगत होतीस गं? छे..ऐकायचं राहूनच गेलं गडबडीत...जमलं असतं ना अम्मी, तर आत्ता आले असते बघ..तुझं ऐकलं नाही आणि भाईजान सारख्या दिसणाऱ्या त्याचं ऐकलं..अल्लानी मला त्याचीच शिक्षा दिली बघ..

पण अम्मी, तुझी शप्पथ..मी त्याला सांगितलं..अब्बूंनी अनोळखी माणसांसोबत जायला नाही सांगितलं..मी त्यांचं ऐकलं अम्मी..पण त्यांनी माझं काहीच नाही ऐकलं गं..
अम्मी त्यांच्यामध्ये एक चाचा होते..ते मागे एकदा अब्बूंशी मोठमोठ्याने ओरडून बोलत होते ना? ते...त्यांनी मला जवळ घेऊन पाठीवर हात फिरवला..कित्ती छान वाटलं मला...मग ते मला त्या डोंगराच्या पलिकडच्या एका घरात घेऊन गेले..तू म्हणाली होतीस बघ..आपल्या गावातल्या त्या मोठ्ठ्या घरातल्या चाचांचा अल्लाह तिकडे रहातो म्हणून? तू म्हणाली होतीस तिकडे जायचं नाही..पण ते सगळे मला तिकडेच घेऊन गेले...माझा हात त्यांनी खूप घट्ट पकडला होता अम्मी..खूप खूप घट्ट...मला खूप दुखत होतं..पण ते सगळे हसत होते...मला रडूच येत होतं..तुझी खूप आठवण येत होती अम्मी...

त्यांच्या अल्लाचं घर खूप मस्त होतं...मी तेव्हच ठरवलं..तुझ्यासोबत परत इथे यायचं...पण ते सगळे जण माझ्याकडे बघून हसत होते...मला काहीच कळलं नाही...त्या चाचांनी लगेच माझ्या तोंडावर पट्टी बांधली..आणि मला जोरात ढकललं..मी जमिनीवर पडले..आणि तो भईजानसारखा दिसणारा मला मारायला लागला...मला काहीच कळत नव्हतं..मी ओरडत होते..आणि तो मला मारत होता...

अम्मी..त्या वेळी तुझी कित्ती आठवण आली म्हणून सांगू...तू म्हणाली होतीस...कुणालाही अंगाला हात लावू द्यायचा नाही...पण तो मोठा होता ना अम्मी...मी त्याच्यासमोर छोटीशीच होते..त्यानं ताकदीनं मला पकडलं होतं...आणि तो मला सगळीकडे हात लावत होता अम्मी...मी खूप खूप घाबरले होते...तो माझ्या अंगाला चावत सुटला होता...माझ्या अंगावर लोळत होता...मला काहीच कळत नव्हतं अम्मी...पण खूप खूप दुखत होतं...मी त्यांच्या अल्लाला पण म्हटले..मला वाचव म्हणून...पण त्यांचा अल्लापण आपल्या अल्लासारखाच आहे गं...समोर आलाच नाही...सगळे अल्ला असेच का असतात गं?

थोड्या वेळाने तो उठला...मला खूप त्रास होत होता...मग कुठूनतरी ना ते चाचा माझ्या जवळ आले...मला काय चाललंय काहीच कळत नव्हतं...माझ्या डोळ्यांवर गुंगी येत होती...आणि त्या चाचांचा हात माझ्या चेहऱ्यावर फिरत होता...मग छातीवर...मग पोटावर...आणि मग...मग मला झोपच आली गं अम्मी...डोळ्यांसमोर अंधार झाला...पण माझं सगळं अंग हलत होतंं...दर काही वेळाने...पुन्हा काही वेळाने...पुन्हा पुन्हा काही वेळाने...!

मग मला अचानक एक स्वप्नच पडलं गं...मी तुझ्या कुशीत झोपलेय...तू मला थोपटतीयेस..आणि अब्बूजान म्हणतायत अजून किती लाड करशील तिचे?...तूच लाडावून ठेवलंय तिला...आणि तू माहितीये काय म्हणालीस? असू दे...माझी लाडाची लेक आहे ती...मी अब्बूंकडे बघून हसायला लागले...मी हसत होते आणि माझं अंग हलत होतं अम्मी...

मध्येच मला एकदा जाग आली...त्या चाचांसारखीच अजून दोन माणसं माझ्या बाजूला झोपली होती...मग दरवाजातून त्या पुलिस चाचांसारखा दिसणारा एक माणूस आला...तो माझ्याकडे बघत होता...मला वाटलं आपल्या गावातल्या पुलिस चाचांसारखा तो मला पटकन उचलेल आणि तुझ्या कुशीत आणून सोडेल...पण तसं काहीच झालं नाही गं...

तुला माहितीये तो पुलिस चाचा काय म्हणाला? "मारणारच आहेस का? मग मला पण एकदा"...मला तेव्हाही वाटून गेलं अम्मी...मोठी माणसं पण आमच्यासारखाच हट्ट करतात की! पण त्याचा हट्ट वेगळ्याच गोष्टीसाठी होता गं...त्याचा हट्ट माझ्यासाठी होता...तो माणूस माझ्या जवळ आला...पण मला परत झोप येत होती...माझं अंग हलत होतं फक्त...

अम्मी..आता तर मला काही कळतच नव्हतं...मला काही जाणवतच नव्हतं...मला काही दिसतच नव्हतं...आवाज तर कधीच पोटात जिरला होता...पण अंग हलत होतं...

मध्ये एकदा मला जाग आली अम्मी...माझा एकच डोळा उघडत होता..मी डोळ्याच्या फटीतून बघायचा प्रयत्न केला...त्या भाईजानसारख्या दिसणाऱ्या मुलाच्या हातात मोठ्ठं काहीतरी होतं...ते काय आहे हे बघायचा प्रयत्न मी करत होते...डोळ्याला त्रास होत होता म्हणून मी पापणी बंद केली आणि ती परत उघडायच्या आत माझ्या डोक्यावर मोठ्ठं काहीतरी येऊन आदळल गंं...आभाळच फाटल्यासारखं झालं मला...

मी सुन्न होते...डोळेच उघडत नव्हते...अंग जणूकाही त्या डोंगरावरच्या बडा पत्थरासारखं झालं होतं...आधी हलणारं अंगही आता हलत नव्हतं...कानावर काहीतरी बोलायचा..मध्येच हसायचा..मध्येच ओरडायचा आवाज येत होता...नंतर नंतर तोही येईनासा झाला...हळूहळू सगळंच शांत झालं...पण मला मोकळं वाटायला लागलं...का कुणास ठाऊक...शांत वाटायला लागलं...अगदी तुझ्या कुशीत झोपल्यावर वाटायचं ना? अगदी तस्स...!

अम्मी...माझ्यासोबत असं सगळं करताना त्यांना काहीच का गं वाटलं नाही? मी ओरडत असताना त्यांना काहीच का गं ऐकू गेलं नाही? मी रडत असताना त्यांनी काहीच का गं केलं नाही? मी मोठी असते ना अम्मी, तर त्या भाईजान सारख्या दिसणाऱ्या मुलाला मारलं असतं..त्या चाचांसारख्या दिसणाऱ्या माणसाला दूर लोटलं असतं...त्या पुलिस चाचाच्या तावडीतून पळून आले असते...ही माणसं अशी का असतात गं अम्मी?

(कथुआमध्ये ८ वर्षांच्या काश्मिरी मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला..पण त्याहून जास्त धक्का बसला, तो या बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या संघटना आणि राजकीय नेत्यांमुळे...!!!)

Wednesday, March 7, 2018

पुतळेबाजी



चला...
आता पुतळ्यांचं राजकारण करूया...
सर्व गरीबांची पोटं भरलीयेत...
सर्व बेरोजगारांना नोकरी मिळालीये...
सर्व शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाय...
सर्व मुलांना शिक्षण मिळालंय...
आपले प्रश्न तर सगळेच सुटलेत..मग काय?
चला...आता पुतळ्यांचं राजकारण करूया..

आया-बहिणींना बाहेर पडताना भीती वाटत नाही..
सरकारी बाबू फायलीसाठी पैसा लाटत नाही...
प्रमोशनसाठी कुणी कुणाचे तळवे चाटत नाही...
निवडणुकांसाठी कुणी कुणाला नोटा वाटत नाही...
समाधानानं डोळे तर सगळेच मिटलेत..मग काय?
चला...आता पुतळ्यांचं राजकारण करूया..

चोऱ्या-माऱ्या पाहून थकलेत सारे...
हक्कासाठी भांडून वाकलेत सारे...
स्वत:च्याच स्वार्थात माखलेत सारे...
पैशानं कणे मोडून टाकलेत सारे...
तेच तेच चघळून तर सगळेच विटलेत...मग काय?
चला...आता पुतळ्यांचं राजकारण करूया..

प्रविण वडनेरे

Friday, January 13, 2017

रास्ता बोला....

न सोचा, न समझा
न जाना के कितनी 
मुश्किलें आयेंगी
मगर जैसे ही कदम बढाया
रास्ते ने पहल की
भई जा तो हम भी उसी ओर रहें है
क्यों ना साथ में ही चल दें
मंज़िल का तो पता नहीं
कम से कम सफ़र तो अच्छा कटे...

थँक्यू...!!!

"थँक्यू मित्रा"...माझ्या थँक्यूमुळे त्याची प्रचंड चलबिचल झाली होती...शेअर टॅक्सीच्या रांगेत तो माझ्या अगदी पुढेच उभा होता...आणि त्याच्याही पुढे किमान आठ ते दहा जण/जणी उभ्या होत्या...त्यामुळे त्या परिस्थितीतून पळ काढणं त्याच्यासाठी अशक्य होऊन बसलं होतं...गुटखा खाऊन त्यानं टाकलेली रिकामी पुडी अजूनही त्याच्या पायाशी रेंगाळत होती...आणि माझं थँक्यू त्याच्या कपाळावर जाऊन चिकटलं होतं...गोची तर झाली होती..."अब क्या करें...कहीं फेंकने के लिए जगह भी तो नहीं छोडी?"...त्याचा खच्ची झालेला पराभूत प्रश्न..."फिर जेब में डाल लो और घर जा के डस्बिन में फेंको"...माझं सहज उत्तर...काही क्षण तो विचारात पडला..आणि मग अचानक त्यानं फेकलेली पुडी उचलून खिशात टाकली..."आप सही केहेते हो"...या वेळी मात्र त्याची प्रामाणिक प्रतिक्रिया आली...मीही मग "अब सही में थँक्यू" म्हणत त्याच्या पाठीवर हात ठेवला..बदल शक्य आहे याची खात्री पटली...

(वि.सू.- इतकी वर्ष मुंबईत राहूनही पुणेरी खोचकपणा जिवंत असल्याचं आणि तो असाही कामी आल्याचं नंतर माझं मलाच समाधान मिळालं ;) )

पत्थर

कभी तो पत्थरों में जान आएगी
इस आस में बैठा वो पत्थर
इक दिन समा गया जमीन में
कुछ सौ साल बाद
ढुंढकर इतिहास बनने
गलती तो उसी की थी
भला पत्थरों में भी कभी जान आती है?

Thursday, October 8, 2015

शेवटची रात्र...

शेवटची रात्र...
ठाक्....हातातल्या खड्यांशी खेळत असलेलं ५ वर्षांचं पोर आवाजासरशी दचकलं...आईनं ताडपत्रीचं टोक कठड्यावर ठेऊन त्याच्यावर भलामोठा दगड उचलून ठेवला होता...आई माझी चड्डी भिजतेय..हातातली खडी टाकून पोरगं आई बिलगलं...आईनं पोराला जवळ ओढत त्याची भिजलेली चड्डी झटकल्यासारखं केलं...वाळंल हां बाळा...पोराचं समाधान झालं आणि पोरगं त्या झोपडी नावाच्या प्रकारात कोप-यातल्या गोणट्यावर जाऊन बसलं...परत खड्यांचा खेळ सुरु...
पाऊस पडणार हे लक्षात आल्यावर तिनं ताडपत्री व्यवस्थित पसरली होती..फूटपाथबाजूचा उंच कठडा ते खालचा रस्ता अशी ताडपत्री तिनं लावली होती...भल्यामोठ्या दगडांनी त्या ताडपत्रीला आधार दिला होता...आणि मधल्या त्या त्रिकोणी खोलीत तिचं आख्ख कुटुंबं निजलं होतं...चारच दिवसांपूर्वी नव-याला वेठबिगारीचं मोठं काम मिळालं होतं...शंभर पाट्या विटा वाहून झाल्यावर ठेकेदारानं खूश होऊन नव-याला साईटवरचा भोक पडलेला ताडपत्रीचा तुकडा दिला होता...त्या दिवशी तिनं मोठ्या खुशीत जवळच्या पिशव्यांचं ठिगळ त्या भोकावर लावून शिवलं होतं...आणि पावसाळ्याच्या चार महिन्यांसाठी त्यांच्या घराला छप्पर मिळालं होतं...
आये पानी आलं...पोरगं इवळलं आणि तिची तंद्री तुटली...पोराच्या अंगाखालचं गोणटं ओलंचिंबं झालं होतं...फूटपाथच्या कठड्याला लागून पाणी थेट तिच्या घरात ओघळत होतं..पलीकडचा कोपरा ओलाचिंब झाला होता..तिनं पोराला नव-याच्या बाजूला जागा करून झोपवलं...आणि तीही त्याच्याशेजारी अंगाचं मुटकुळं करून पडली...दिवस संपला...रात्रीचा प्रश्न होता...
ताडपत्रीच्या छप्परावर पावसाच्या पाण्याची टपटप वाढायला लागली तशी तीची धडधडपण वाढायला लागली..तापानं फणफणलेला नवरा तिच्या बाजूलाच झोपला होता...दोन दिवसांपासून ताप उतरतच नव्हता...त्यात आता पावसानं धार धरली होती...जवळच्या होत्या नव्हत्या त्या सगळ्या चिंध्या तिनं नव-याला पांघरून दिल्या होत्या...नव-याला पाणी लागलं तर खेळ खल्लास...छातीत धस्स झालं...
प्लॅटफॉर्म नंबर दो पर आनेवाली लोकल एक बजकर ४८ मिनटकी कसारा जानेवाली धीमी लोकल है...अजून ६ तास...तिनं दीर्घ उसासा सोडला...सकाळी साडेसात वाजता बाजूच्या शेडमध्ये ट्रॅव्हलवाल्यांची बस पार्किंगला लागणार होती...आणि बरोबर १५ मिनिटांनी क्लिनर निघून गेल्यावर तिचं कुटुंबं त्या बसमध्ये मागच्या बाजूला स्थलांतरित होणार होतं...उद्या रात्रीपर्यंत...नेहमीप्रमाणे...पण आज पाऊस तिच्या नव-याच्या जिवावर उठला होता...तिचं कुंकू धुवून काढायला..
बाटली फुटल्याच्या आवाजानं तिला जाग आली...तिनं डोकावून बघितलं... झोपडीजवळ दारू पिलेली दोन माणसं तिच्या अगदी शेजारी वाटावीत इतकी जवळ भांडत होती...त्यातल्या एकानं तिच्या डोक्याजवळच बाटली फोडली होती..तिच्या पोटात गोळा आला...बाजूला झोपलेल्या नव-याकडे तिनं पाहिलं...तिला धीर वाटला...मघाशी आधाशासारखा पडणारा पाऊस आता रिमझिम झाला होता...मादरचोत रात्रीच्या साडेतीन वाजता तुला अंडाभुर्जी खायचीय भाडखाव...बाटली फोडणा-याला दुसरा बेवडा म्हणाला...अजून ४ तास...ती म्हणाली...नव-याच्या तापामुळे गारठ्यातसुद्धा तिला आता उष्ण वाटायला लागलं होतं...
डॉक्टरनं सकाळीच तिला सांगितलं होतं...आज ताप उतरला नाही तर काही खरं नाही...सरकारी दवाखान्यात औषध तर मिळालं, पण नव-याला झोपवायला जागा नव्हती मिळाली...म्हणूनच तर तिनं या झोपडीतच नव-यासाठी वॉर्ड तयार केला होता...तिच्या दोन्ही फाटक्या साड्या खाली आंथरल्या होत्या...नव-याची दुसरी पॅंट आणि चपलांची उशी केली होती...आणि अंगावरची साडी पांघरायला दिली होती...पण एवढ्यावर नव-याचा ताप थांबणार नव्हता...आणि तिच्याकडे पर्याय नव्हता...
भानु...भानु...ए भानु...थंडी वाजतीये गं...भानुsss...नव-यानं मोठ्या कष्टानं मारलेली शेवटची हाक ऐकून तिला जाग आली आणि भीतीचा गोळा तिच्या गळ्याशी आला...नवरा धरणीकंप झाल्यासारखा थरथरत होता...ती झपकन उठून नव-याकडे गेली...झोपडीच्या दुस-या बाजूला ओघळणारं पाणी नव-याकडे सरकू लागलं होतं...तिनं नव-याचा हात हातात घेतला....क्षणभर आगीतच हात टाकलाय की काय असं तिला वाटलं...तिनं भानावर येत कमरेच्या पोटलीतून गोळ्यांचं पाकीट काढलं आणि मडक्यातलं पाणी पाजत नव-याच्या तोंडात गोळी टाकली...काही वेळानं नवरा शांत झाला...
प्लॅटफॉर्म नंबर एक पर आनेवाली लोकल पाँच बजकर ३६ मिनट की मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस जानेवाली धीमी लोकल है...तीचा जीव गळ्याशी आला होता..शेवटचे दोन तास...
पोरगं मध्येच चुळबुळायचं...परत शांत व्हायचं...अंथरलेली साडी तिनं पुन्हा सरळ केली...आणि पोराजवळ जाऊन आडवी झाली...आता तिच्या कानांवर वेगवेगळे आवाज यायला सुरुवात झाली होती..कडक बुटांचे..टाचांच्या सॅण्डल्सचे..करारणा-या चपलांचे...पाण्यात पडणा-या ढांगांचे...रपरपणा-या पावसाचे आणि नव-याच्या कण्हण्याचे...पण ती आतुरतेनं वाट पहात असलेले आवाज काही तिला येत नव्हते...शेडमध्ये लागणा-या बसच्या टायरचे...त्या आवाजापुढे जगातले सगळे आवाज तिला फिके वाटत होते...निरर्थक...निर्जीव...नि:शब्द...आता तर तिला काही ऐकू येईनासंच झालं होतं...नव-याचं कण्हणंही...तिला हात गरम वाटत होता...खूप गरम...खूप खूप गरम..कदाचित नव-याला हात लावल्यामुळे...पण आसपासचा थंडावा ती उष्णता कमी करत होता...आणि तिनंच शिवलेल्या पिशव्यांच्या ठिगळाकडे बघत ती पडली होती...साडीच्या टोकावर...
आय डोण्ट लाईक रेन यार...लुक अॅट माय न्यू सॅण्डल्स..ऑल द टाईम यू हॅव टू कॅरी अम्ब्रेलाज अॅन ऑल यू नो...इट्स डिजगस्टींग...ओह शीट...
महागड्या सॅण्डलमधला तीचा पाय पचकन एका खड्ड्यात पडला...खड्ड्यातलं पाणी शेजारच्याच ताडपत्रीमध्ये पसरलं...पावसाला अस्खलित इंग्लिशमध्ये अजून शिव्या हासडत ती पुढे निघून गेली...खड्ड्यात काय झालं हे बघायला ती मागे वळली...खड्ड्यातल्या पाण्यापेक्षा शेजारच्या ताडपत्रीमध्ये जास्त पाणी होतं...एक लहानसं पोर बापाचा पाय धरून रडत होतं...उकीडव्या बसलेल्या बापानं डोक्याला हात लावून नजर स्थिर केली होती...आणि त्याच्या समोर एक ३०-३२ वर्षांची अंगावर फक्त परकर-पोलकं असलेली तरूण स्त्री वरच्या ताडपत्रीला डोळे लावून पडली होती...खड्ड्यातून पचकन उडालेलं पाणी तिच्या चेह-यावर पसरलं होतं...पण तिला काहीच फरक पडला नव्हता...पडणार नव्हता...

शेजारच्या शेडमधून बसच्या हॉर्नचा कर्कश्श्य आवाज आला.... 



(सदर कथा 'तनिष्क' मासिकाच्या जुलै, २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली आहे)

Tuesday, October 6, 2015

पिंजट म्हातारा...

मृत्यू अटळच असावा
रस्त्यावरच्या फुटलेल्या दगडावर
तोल आत्ता जाईल की नंतर
या भीतीत बसलेला पिंजट म्हातारा स्वत:शीच म्हणाला...
नाहीतरी हल्ली जिवंत रहाण्याचीच भीती वाटते
गडबड, गोंगाट चर्चा पुचाट
सडलेले मेंदू उंची कापडात लपेटून
फिरतात हल्ली गल्लीबोळात
कुजलेल्या नजरा ओंगळवाण्या होऊन
उगाच बघतात त्यांच्याकडे..
कुस्करलेलं शरीर सडक्या जखमा घेऊन
आंधळ्याच्या दारात बसलंय
सावकारानं ओरबाडलेले श्वास
गावाबाहेरच्या माळावर लटकतायत
दमडीसाठी चामडी सोलून काढायला
शिवशिवतायत लाखो हात
भुकेनं गोठलेले निष्पाप जीव
हाडांना कातडं चिकटेपर्यंत जगतायत..जगवले जातायत
पांढरे झालेले केस उगाचच आशेवर बसलेत
बर्फासारख्या गोठलेल्या रक्ताच्या सळसळण्याच्या
पण मुर्दाडलेल्या चरबीमधलं ते रक्त निपचित वाहतंय
नाल्यातल्या घाण पाण्यासारखं
मेलेल्या लाखो जिवांना घेऊन..त्यांची पुढारकी करत
खरंच...मृत्यू अटळच असावा
रस्त्यावरच्या फुटलेल्या दगडावर
तोल आत्ता जाईल की नंतर
या भीतीत बसलेला पिंजट म्हातारा स्वत:शीच म्हणाला...

नाहीतरी हल्ली जिवंत रहाण्याचीच भीती वाटते...